Ad will apear here
Next
अवश्य वाचावे असे गीत महाभारत!
‘एखाद्या पुस्तकाचा जन्म कुठे कधी होईल ते सांगता येत नाही. ४३ वर्षं अमेरिकेत राहणारा एक इंजिनीअर, नोकरीनिमित्त कारने रोज तीन-चार तास प्रवास करताना त्याला अचानक एक दिवस महाभारतावर एक कविता स्फुरते. ती तो चक्क डाव्या हाताने ड्रायव्हिंग करत उजव्या हाताने वहीकडे न पाहता गिचमिड खरडवून काढतो. आणि असं करता करता काही दिवसांनी चक्क ६१ कवितांमध्ये त्याचं ‘गीत महाभारत’ तयार होतं! आहे ना विलक्षण?!! त्याच पुस्तकाचा हा परिचय...
...............
शशिकांत पानट हे एक अजब रसायन. पेशाने इंजिनीअर, ४३ वर्षं अमेरिकेत स्थायिक; पण भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जुळलेले. बहुसंख्य भारतीयांप्रमाणे कधी ना कधी महाभारत वाचलेले; पण शंकर केशव पेंडसे यांचं ‘महाभारतातील व्यक्तिदर्शन’ हे पुस्तक वाचून ते भारावले गेले. त्या पुस्तकातला एकेक प्रसंग वाचताना तो डोळ्यांसमोर उभा राहून त्यांना त्याविषयी आपोआपच कविता स्फुरत असे. 

एकीकडे ‘गदिमां’च्या गीत रामायणाची मोहिनी होतीच. त्यामुळे तशाच पद्धतीचं ‘गीतमहाभारत’ पानट यांनी आपल्या कल्पनेतून उतरवलं. अवघ्या ६१ गीतांमध्ये महाभारतासारखं प्रचंड महाकाव्य बसवणं हे किती अशक्यप्राय काम?!! पण पानट यांनी ते शिवधनुष्य पेललंय हे पुस्तक वाचताना जाणवतं.

या पुस्तकाला अत्यंत आकर्षक रूप प्राप्त झालंय ते विजयराज बोधनकर यांच्या रेखाचित्रांमुळे! अत्यंत कलात्मक आणि त्या त्या प्रसंगाला साजेशी, अनुरूप चित्रं त्यांनी रेखाटली आहेत त्यामुळे पानट यांचं काव्य अधिक फुलून समोर येतं. पानट यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे त्यातली काही गीतं ही त्यांच्या कल्पनेतल्या प्रसंगांवर आधारित आहेत. त्यामुळे पुस्तकाची चिकित्सा किंवा विश्लेषण हे व्यासांच्या महाभारताशी तुलना करून किंवा ताडून न पाहता स्वतंत्र आविष्कार म्हणूनच पाहावं. 

सुरुवात होते ती महाभारतकालच्या हस्तिनापूर नगरीच्या वर्णनाने. ‘मंत्रांचा हा घोष घुमतसे, हस्तिनापूर नागरी; गृहागृहांतून वेद नांदती, या नंदनभुवनी।।’ अशा पहिल्याच ओळी वाचकाला या गीतमहाभारताकडे आकर्षित करतात.

आणि मग एकामागोमाग एक व्यक्तिरेखांचा परिचय अतिशय समर्पक काव्यरचनेतून आपल्यासमोर उलगडत जातो. बालअर्जुनापासून सुरुवात होऊन कौरव आणि पांडव बटू, कृपाचार्य, द्रौपदी, दुर्योधन, विदुर, शकुनी, दु:शासन, कर्ण, युधिष्ठिर, भीष्म, उत्तरा, श्रीकृष्ण अशा व्यक्तिरेखांच्या आणि विविध प्रसंगांच्या वर्णनातून बहुतांशी महत्त्वाचे प्रसंग आपल्यासमोर उलगडत जातात.

बालअर्जुनाच्या लीला सांगताना त्याला पडलेले प्रश्न पानट यांनी बोबड्या भाषेत लिहून गंमत आणली आहे –‘तो कछा सांग ना, आकाशातून चंदल शालखा फिलतो? सुलयाच्या मागे, शांग कशाला ज्यातो?’... तर द्यूतात हरलेल्या द्रौपदीला फरफटत आणलं गेल्यावर, तिने पूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कर्ण दु:शासनाला सांगतो ‘छेड वस्त्र, कर विवस्त्र आक्रंदू दे तिला, कर शासन दु:शासन, सुदिन आज उगवला।।’ आणि दु:शासन जेव्हा द्रौपदीची वस्त्रे फेडू लागतो तेव्हा चवताळलेला भीम गर्जना करतो –‘द्रौपदीच्या जरी नखाला, पापकर्म्या स्पर्श केला, समूळ टाकीन उपटून , ना तुलाची तव कुळाला।।’

युद्धभूमीवर अचानक कच खालेल्या आणि युद्धाला नकार देणाऱ्या अर्जुनाला कृष्ण सांगतो- ‘पार्था, संभ्रम सोडून दे – बंधू नच हे, रिपुच असती, मनात जाणून घे।। निज-सत्त्वासी जाणं अर्जुना, कर्तव्या अन धर्म, अधर्मा, शस्त्र उगारून, निजधामांसी त्यांसी धाडून दे।।’

कुरुक्षेत्राचं युद्ध संपतं आणि पुस्तकाचा शेवट पानट करतात ते अगदी सोप्या शब्दांत – ‘कौरव-पांडव युद्ध संपले, इतिहासाचे सोने झाले, धर्म वर्णिला श्रीकृष्णाने, जेथे पांडुसुता।। कुणाकुणाला भाग्य लाभते, प्राक्तन जैसे, दैव खेळते; कुणा मृत्यू. जीवदान कुणासी, मानव जीवन व्यथा।। ....अन्यायास्तव घडली क्रांती, सहस्र वर्षे गातील महती, धर्मधारक ही भविष्यकाली, पूजितील शौर्यकथा।।’...

शेवटच्या काही पानांत महाभारताविषयी उपयुक्त संकीर्ण माहिती, तक्ते, महायुद्धात अठरा अक्षौहिणी सैन्यातून जिवंत राहिलेल्या तेरा योद्ध्यांची नावं, वंशावली अशी भरपूर माहिती वाचकाला मिळते. 

असे हे गीत महाभारत अवश्य वाचावे असे!

पुस्तक : गीत महाभारत  
लेखक : शशिकांत पानट  
प्रकाशन : ५ डायमेन्शन्स एन्टरटेन्मेंट, ५७७ वॉल्टर अव्हेन्यू, कॅलिफोर्निया, यूएसए. 
पृष्ठे : २२९ 
मूल्य : २५० ₹ 

(‘गीत महाभारत’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)   

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZPIBL
Similar Posts
गुलजारांच्या साहित्याचा रसास्वाद ‘प्रेमा तुझा रंग कसा, हा प्रश्नच कधीही पडला नाही, आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत, हाच रंग अजून उतरला नाही’ अशी काव्यमय दाद आपल्या आवडत्या गुलजारांच्या साहित्याला देणारे चंद्रशेखर टिळक यांचं गुलजारजींविषयीचं प्रेम आणि भक्ती त्यांच्या ‘मला भावलेले गुलजार’ या पुस्तकाच्या पानापानांतून दिसत राहते. त्या पुस्तकाचा हा परिचय
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language